पाकिस्तानसह अन्य अकरा देशातील नागरिकांना युएईने व्हिसा देणे केले बंद


दुबई – पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणे संयुक्त अरब अमिरातीने बंद केले आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा युएईने बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय कोरोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानसह अन्य ११ देशातील नागरिकांसाठी यूएईने पुढील सूचना मिळेपर्यंत नव्याने व्हिसा जारी करणे बंद केल्याचे आम्हाला समजल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाहीद हाफीझ चौधरी यांनी सांगितले. पाकिस्तान शिवाय टर्की, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना यूएई सरकारने व्हिसा जारी करणे स्थगित केले आहे. पाकिस्तानात मागच्या आठवडयाभरात नव्याने दोन हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या जून महिन्यात वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.