अन् अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रोहित पवार


मांडवे- पिंगळी – सध्या सोशल मीडियावर कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे तडफदार आमदार रोहित पवार यांची चर्चा सुरु आहे. आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला रोहित पवार धावले आहेत. काट्यात गेलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी रोहित पवार यांनी स्वत: मदत केली. सध्या सोशल मीडियावर रोहित पवार यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान अपघात झाला होता. दामोदर काटकर यांची व्हॅन अपघातानंतर रस्त्याच्या खाली काट्यामध्ये गेली होती. आमदार रोहित पवार यांनी हा प्रकार पाहताच गाडी थांबवत त्यांनी अपघातस्थळी धाव घेत, काटकर यांची चौकशी करत आधार दिला. रोहित पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत सहकाऱ्याच्या साह्याने तात्काळ मदत केली.

शेतकरी काटकर या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांची तात्काळ रुग्णालयात जाण्याची रोहित पवार यांनी सोय केली. रोहित पवार यांनी उपस्थितांच्या मदतीने शेतकऱ्याची व्हॅन ढकलत रस्त्यावर आणली. सध्या सोशल मीडियावर रोहित पवार यांच्या या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा सुरु असून सर्वच स्तरातून त्यांच्या या मदतीचे कौतुक होत आहे. रोहित पवार यांचा फोटो एका चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसंगाचे वर्णन केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांना सामाजिक संदेशही दिला आहे.


रोहित पवार म्हणाले की, पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.