फडणवीसांचे ‘ते’ स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही – जयंत पाटील


मुंबई – मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढवणार आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहू नये. त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत नुकतीच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यावेळी संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबई सुरु केल्याची घोषणा केली, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला खात्री आहे या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल.

जयंत पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. फडणवीसांना मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असे वाटणे साहजिकच आहे. पण जोपर्यंत शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी जो संवाद टीव्ही9 मराठीशी साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.