पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदला ठोठावली १० वर्षांची शिक्षा


इस्लामाबाद – पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गाने पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये ही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जुलै २०१९मध्ये याप्रकरणी हाफिजला अटक करण्यात आली होती.

हाफिज सईदला जुलै २०१९मध्ये दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आतापर्यंत चार प्रकरणातील आरोप हाफिजविरोधात निश्चित झाले आहेत. जमात उद दावाच्या नेत्यांविरोधात एकूण ४१ गुन्हे व्यावसायिक कर विभागाने दाखल केले आहेत. यामध्ये २४ प्रकरणाचा निकाल लागला आहेत. तर इतर गुन्हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत.

दहशतवादविरोधी न्यायालयाने ऑगस्टमध्ये कुख्यात दहशतावादी हाफिज सईदच्या वर्तुळातील जमातच्या तीन नेत्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपूरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा हाफिज सईद संस्थापक आहे. हाफिज पाकिस्तानमध्येच जमात उद दावा नावाची संघटनाही चालवतो. २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद सूत्रधारही आहे.