राजधानी दिल्लीत विनामास्क दिसल्यास २ हजार रुपयांचा दंड


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशाची राजधानी दिल्लीमध्ये अतिशय वाढले असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. १३१ रुग्णांचा काल दिवसभरात मृत्यू झाला आहे. केजरीवाल सरकारने या पार्श्वभूमीवर आता नियम अधिक कडक करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आता दिल्लीकरांना मास्क न घातल्यास दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ५०० रुपये दंड आकारला जात होता. पण तरी देखील नागरिक मास्क वापराबाबत गंभीर झाले नसल्याचे दिसून आल्याने व वाढता कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दंडाची रक्कम आता दोन हजार रुपये करण्यात आली आहे.

दरम्यान, राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लवकरच अतिरिक्त ३०० आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रविवारी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ऑक्सीजनसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर दिल्ली पालिकेच्या अखत्यारीतील काही रुग्णालये कोविड रुग्णालयांत रूपांतरित करण्यात येणार असून मनुष्यबळाच्या अभावामुळे डॉक्टर आणि निमवैद्यकीय दले तैनात केली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.