वैज्ञानिक डाटाच्या आधारे कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांची संख्या राजधानी दिल्लीत झपाटयाने वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य फिक्की एफएलओच्या एक वेबिनारमध्ये केले आहे. कोरोनावरील लस पुढच्या तीन ते चार महिन्यात देशात तयार होईल, असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनावरील लस पुढच्या तीन ते चार महिन्यात तयार होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. वैज्ञानिक डाटाच्या आधारावर कोणाला प्राधान्य द्यायचे त्याचा आराखडा ठरवण्यात येईल. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, कोरोना योद्ध्यांना साहजिकच प्राधान्य मिळेल, त्या खालोखाल वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. आपल्या सर्वांसाठी चांगले २०२१ वर्ष ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. २५ ते ३० कोटी लोकांसाठी जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये कोरोना लसीचे ४० ते ५० कोटी डोस उपलब्ध झालेले असतील, असा अंदाजही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर लसीबाबत प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, जे कोरोना योद्धे आहेत, त्यांना प्राधान्य मिळेल. त्यानंतर ६५ वर्षावरील व्यक्ती, ते झाल्यानंतर ५० ते ६५ वयोगटाला प्राधान्य मिळू शकते, असे हर्षवर्धन म्हणाले.

वयोवुद्ध व्यक्ती झाल्यानंतर ५० पेक्षा कमी वयाचे, ज्यांना अन्य आजारही आहेत, त्यांच्याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून तज्ज्ञ निर्णय घेतील. याबाबत सविस्तर योजना आम्ही तयार केली आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये काय करायचे आहे? त्याच्या नियोजनाला आतापासून सुरुवात केली पाहिजे, असे हर्ष वर्धन म्हणाले.