ख्रिसमसपूर्वी होऊ शकते फायझर-बायोएनटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणाला सुरुवात


नवी दिल्ली – फायझर Inc आणि बायोएनटेक यांनी एकत्रितरित्या निर्मिती केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या शेवटच्या टप्प्यातील निकालांनुसार ही लस कोरोनावर 95% परिणामकारक असून याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याची माहिती लस विकासकांनी दिल्यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये लस उपलब्ध होऊ शकते. दरम्यान, या लसीबद्दल सकारात्मक माहिती म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास या लसीचे वितरण ख्रिसमस 2020 पूर्वी सुरु होण्याची शक्यता आहे.

रॉयटर्सशी बोलताना बायोएनटेकचे चीफ एक्झिक्युटीव्ह उगुर साहनी (Ugur Sahin) यांनी सांगितले की, सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास अमेरिकेकडून डिसेंबरच्या पूर्वाधापर्यंत लसीसाठी मंजूरी मिळेल आणि लसीच्या वितरणाला ख्रिसमसपूर्वी सुरुवात होईल. पण हे होण्यासाठी सर्व गोष्टी सुरळीत होणे गरजेचे आहे. या लसीची सकारात्मक गोष्ट म्हणजे या लसीचा परिणाम लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांवर सारखाच होता. युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेडरकडून या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते, अशी माहिती Ugur Sahin यांनी रॉयटर्सला दिली.

सोमवारी मॉर्डनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या निकालाअंती त्यांची लस 94.5% परिणामकारक असल्याचे दिसून आले. आपल्याकडे सध्या दोन सुरक्षित आणि सकारात्मक परिणाम देणाऱ्या लसी उपलब्ध असून त्यांना लवकरच एफडीएकडून परवानगी मिळताच वितरणासाठी या लसी काही आठवड्यातच तयार होतील, अशी माहिती अमेरिकेचे आरोग्य व मानव सेवा सचिव अ‍ॅलेक्स अझर यांनी दिली आहे.