सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून इंजिनीअरने चार महिन्यात केली लाखोंची कमाई


मुंबई – बिहारमधील एका युट्युबरवर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फेक व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता गेल्या चार महिन्यांत संबंधित व्यक्तीने युट्यूबवर सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल १५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीचे नाव राशिद सिद्दिकी असे असून तो २५ वर्षांचा आहे.

राशिद हा इंजिनीअर असून ‘एफएफ न्यूज’ (FF News) या नावाने त्याने युट्युब चॅनल सुरू केले. यासंदर्भातील वृत्त ‘मिड डे’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी राशिदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशिदने पोस्ट केलेल्या मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविरोधात व्हिडीओला लाखोंहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अपलोड केलेल्या व्हिडीओ अधिकाधिक व्ह्यूज सुरुवातीला मिळत गेल्याने सप्टेंबर महिन्यात त्याने साडेसहा लाखांची कमाई केली होती. त्यानंतर त्याच्या युट्युब चॅनलचे सबस्क्राइबर्ससुद्धा वाढू लागले होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याचे दोन लाख सबस्क्राइबर्स होते तर आता हा आकडा ३.७० लाखांवर गेला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाविषयी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये कुतुहल होते आणि राशिदकडून याचाच वापर पैसे कमावण्यासाठी केला गेल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.