१५ कोटींच्या अपहार प्रकरणी भाजप आमदारासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल


औरंगाबाद – बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप प्रशांत बंब यांना अटक करण्यात आलेली नसून हा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबप हा गुन्हा व्याज वाटण्याच्या नावाखाली अधिकची दिली जाणारी रक्कम अपहार करण्यासाठी बेकायदेशीररित्या वापरल्याच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे.

मागील अनेक वर्षांपासून गंगापूर सहकारी साखर कारखाना बंद आहे. या कारखान्यावरील कर्जापोटी हा कारखाना राज्य सरकारने जप्त देखील केलेला आहे. तर, हा कारखाना संबंधित बँकेने विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून न्यायालयीन कारवाईत रक्कम जमा करण्यात आल्यानंतर हा विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे ही रक्कम न्यायालयाकडून कारखान्याच्या खात्यात जमा झाली होती. आतापर्यंत ती व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कारखान्याशी बँकेच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचा काहीही संबंध नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब व त्यांच्या काही संचालकांनी म्हटल्याची तक्रार कारखान्यातील सभासदांनी एकत्र येत केली आहे. तसेच, पैशांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कारखान्याला ही रक्कम ७ नोव्हेंबर २०२० रोजी परत मिळाली. तत्पूर्वी कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब व प्रभारी संचालक बी एम पाटील यांनी संगनमत करून २० जुलै रोजी ही रक्कम बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडून व खाते उघडण्यासाठी देखील कारखान्याचा ठराव करण्यात आला होता, तो देखील बनावट असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. खाते उघडत असताना कारखान्याची भागीदारी दाखवण्यात आली. आमदार बंब व पाटील हे त्यामध्ये भागीदार असल्याची बनावट कागदपत्र तयार केली गेली. खाते नागरी सहकारी बँकेत उघडत असताना जी परवानगी घ्यावी लागत होती, ती परवानगी देखील घेतली नसल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. विविध ठिकाणी प्राप्त झालेली रक्कम टाकण्यात आली. कारखाना हा वित्तीय संस्था नसल्यामुळे ती व्याज वाटू शकत नसल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.