…म्हणून नितेश राणेंना राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार पाहिजे


मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन केली असल्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजासाठी कर्नाटकात महामंडळाची स्थापन केली. पण फडणवीस सरकारने राज्यातील मराठ्यांना दिलेले सगळे बंद करुन टाकल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

यासंदर्भात ट्विट करताना नितेश राणे म्हणाले, की कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, 50 हजार कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!!.


कर्नाटक सरकारकडून मराठा समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या महामंडळाची स्थापन करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या महामंडळाची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली. या महामंडळाची स्थापना मराठा समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. पण मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी करण्यात येणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे मराठा आरक्षणाची सुनावणी वर्ग झाली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रीने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली.