इशान किशन घेऊ शकतो संघात धोनीची जागा – एम. एस. के. प्रसाद


मुंबई – आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावले. मुंबईने अंतिम फेरीत दिल्लीवर ५ गडी राखून मात केली. कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक आणि इशान किशनने मधल्या फळीत केलेली फटकेबाजी हे संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यंदा मुंबईकडून खेळत असताना इशान किशनने चांगलेच प्रभावित केले. किशनने युएईतील मैदानांवर जोरदार फटकेबाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. किशन हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला असून तो एकदिवसीय आणि टी-२० संघात धोनीची जागा घेऊ शकतो, असे मत बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संघाचे २०१९ विश्वचषकात आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर वर्षभर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. निवड समितीने धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली, पण पंतने वर्षभरात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आता लोकेश राहुल आणि संजू सॅमसनचा पर्याय भारतीय संघाने वापरायचे ठरवले आहे. इशान किशनसारख्या छोट्या चणीच्या खेळाडूला फटकेबाजी करताना पाहणे खरच आश्वासक आहे. त्याच्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला गेला. त्याने सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर आणि जिथे गरज असेल तिकडे सलामीला येऊनही आपल्यातील गुण सिद्ध केले आहेत. संघाला गरज असेल त्याप्रमाणे आपल्या फलंदाजीत बदल करुन खेळ करण्याच्या त्याचे कौशल्य वाखणण्याजोगे असल्यामुळे भारतीय संघात टी-२० आणि एकदिवसीय संघात त्याला धोनीच्या जागेवर स्थान मिळू शकते, असे प्रसाद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.