देशात पुढील १० ते २० वर्षे मोदींना कोणताही पर्याय नाही – बाबा रामदेव


नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांनी पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही, असे वक्तव्य news 18 india ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मी मोदी भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांना पुढची १० ते २० वर्षे कोणताही पर्याय नसल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्रियोग राहुल गांधी यांनी करावा तर मौन योग काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.

देशात मोदी फॅक्टर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोट्यावधी लोकांचा विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे, हे सगळ्या देशाला ठाऊक आहे. त्याचबरोबर त्यांना काही करायचे आहे ते देशासाठी करायचे आहे. त्यांना हे सगळे प्रभू कृपेने काही मिळाल्याचेही बाबा रामदेव म्हणाले. त्याचबरोबर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी मोदींना कोणताही पर्याय आहे मला तरी दिसत नाही.

तुमच्यावर तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप होतो, असे बाबा रामदेव यांना विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले की मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा मी भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांचा मी सहयोगी असल्याचे उत्तर बाबा रामदेव यांनी दिले.