दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात फोडले फटाके


नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना असलेला धोका लक्षात घेता फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. पण तेथील नागरिकांना प्रशासन आणि सरकारच्या नियमांचा विसर पडलेला पाहायला मिळाला आहे. मोठ्या प्रमाणावर फटाके दिल्लीतील काही परिसरात फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

दिल्लीत सध्या वाढते प्रदूषण आणि कोरोनाच्या रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीची हवा फटाक्यांमुळे जास्तच प्रदुषित झाली आहे. तसेच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हवा गुणवत्ता निर्देशांक 400 वरुन थेट 481 वर पोहचला आहे. तर जवळपास 1000 पर्यत काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि आसपासचे प्रदूषण हे दिवाळीच्या दिवशी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली असूनही लोक फटाके वाजवत होते. 400 च्या वर हवा गुणवत्ता निर्देशांक गेल्यास श्वसनासंबंधी आजार असणाऱ्या लोकांसाठी ते अत्यंत घातक आहे. कोरोना काळत तर हे धोकादायक असल्यामुळेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे.

अशीच परिस्थिती फक्त दिल्लीच नाही तर एनसीआरमध्येही आहे. मोठ्या प्रमाणात इंडिया गेट, नेहरू प्लेस, साऊथ एक्स, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये फटाके फोडण्यात आल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री आणि ते फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास तब्बल एक लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण तरीदेखील दिल्लीकरांनी नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले आहेत.