कोरोनाचा उद्रेक; जगभरात काल दिवसभरात 5.75 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर 5.43 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात मागील 24 तासांत 5 लाख 43 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 807 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत अत्यंत वाईट होत चाचली आहे. दररोज अमेरिकेत दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.

यासंदर्भात वर्ल्डोमीटर वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत 5 कोटी, 43 लाख 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत 13 लाख 17 हजार 398 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 78 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 51 लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील एक लाख लोकांची प्रकृती गंभीर आहे.

अमेरिका कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अव्वल आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1 लाख 57 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर भारताचा नंबर येतो. 88 लाखांहून अधिक लोकांना भारतात कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 41 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 29 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे.