धार्मिक स्थळांसंर्दभात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई – मागील ८ महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी घरीच थांबावे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी धार्मिकस्थळांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना शनिवारी राज्य सरकारने जारी केल्या. धार्मिकस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी या सूचनांचे कठोर पालन करावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने धार्मिक स्थळ व्यवस्थापनांना कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी तसेच सामाजिक अंतर पाळूनच धार्मिक किंवा प्रार्थना स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मास्कचा वापर, धार्मिकस्थळी प्रवेश करण्यापूर्वी हातांचे र्निजतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिकस्थळे बंदच राहणार आहेत.

त्याचबरोबर मंदिरात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले किंवा व्याधीग्रस्तांनी प्रवेश टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, या वर्गातील नागरिकांना रोखण्याची सक्ती केलेली नाही. पण या वर्गातील नागरिकांना मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी प्रवेश देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे.

त्याचबरोबर सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत वादविवाद सुरू आहेत. त्यामुळे या अ‍ॅपची सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनेच न्यायालयात मांडली होती. तरीही आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असा सल्ला धार्मिकस्थळांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आला आहे.

या अ‍ॅपची सक्ती करता येणार नाही किंवा त्याचा वापर बंधनकारक नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यावरही मंदिरे वा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळातील प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला कशासाठी दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिकस्थळी सबंधित व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या वेळेत आणि निर्धारित केलेल्या संख्येप्रमाणे भाविकांना प्रवेश.

राज्य सरकारच्या धार्मिक स्थळांसंदर्भातील नियमावली

  • सर्व धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी मास्क वापरणे बंधनकारक.
  • धार्मिक स्थळ परिसरात सोशल डिस्टेंसिंग नियमाचे पालन आवश्यक, थर्मल स्कॅनिंग, जंतूनाशके ठेवणे आवश्यक.
  • दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर अत्यावश्यक.
  • थुंकण्यास सक्त मनाई, मंदिरात प्रवेश करताना साबणाने हात-पाय स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरने हातांचे र्निजतुकीरकण बंधनकारक
  • आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्यांनाच मंदिरात प्रवेश द्यावा.
  • कोरोनाबाबत धार्मिक स्थळी जनजागृती करणारी व्यवस्था व्यवस्थापनाने उभारावी
  • दर्शनासाठी जागा निश्चिती करावी, त्यानुसार जागा चिन्हांकित (मार्किंग) कराव्यात.
  • प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत.
  • मुर्ती, पुतळ्यांना हात लावण्यास तसेच भजन, आरती करण्यास परवानगी नाही.
  • कोणत्याही धार्मिक ठिकाणी प्रसाद वाटपास मनाई.
  • सामूहिक प्रसादाची (भोजनाची)व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी नियम अंतर पाळून प्रसाद वाटपास परवानगी