सिरमच्या लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग; ‘कोव्हीशिल्ड’ तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण


पुणे : सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाकडून कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आल्यामुळे आता सिरमच्या लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे. याबाबतची माहिती सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. देशातील १५ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) करण्यात येणार आहेत. भविष्यात सिरम आणि आयसीएमआर कोव्होव्हॅक्स या अमेरिकास्थित नोव्हाव्हॅक्सच्या वैद्यकीय विकसनासाठी एकत्र आले आहेत. ज्या स्वयंसेवकांना कोव्हीशिल्ड लसीचे डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम (साईड इफेक्ट) दिसले नसल्यामुळे या चाचण्यांबाबत समाधानकारक असल्याची भावनाही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना सिरम इन्स्टिटय़ुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढय़ामध्ये आयसीएमआरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कोरोना प्रतिबंधासाठी गुणकारी लस विकसित करण्याच्या मोहिमेत भारताला अग्रभागी ठेवण्यासाठी सिरम आणि आयसीएमआर यांच्यातील भागीदारीने महत्वाची भूमिका निभावल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट केले. कोरोनाने सार्वजनिक आरोग्य सेवा आंतर्बाह्य़ परिपूर्ण करण्यासाठी मोठी संधी दिल्याचेही पूनावाला यांनी यावेळी म्हटले आहे.

त्याचबरोबर आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, भारत सध्या लसीची निर्मिती आणि उत्पादनाच्या बाबत जगामध्ये अग्रक्रमावर आहे. सिरमने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याला मिळालेली प्रयत्नांची जोड या बळावर आपल्या क्षमता सिद्ध केल्या असल्याचेही डॉ. भार्गव यांनी यावेळी स्पष्ट केले. देशातील १५ केंद्रांवर तब्बल १६०० स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून, त्यांपैकी बहुसंख्य स्वयंसेवकांना तिसऱ्या टप्प्यातील दुसरा डोसही देण्यात आले आहेत.