राम कदम यांचे राऊतांना आव्हान; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या


मुंबई: दस्ताऐवज दाखवून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले असल्यामुळे उगाचच शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्रागा करून घेऊ नये आणि थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरे द्या, असे आव्हान भाजप आमदार राम कदम यांनी राऊत यांना दिले आहे.

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राम कदम यांनी हे आव्हान दिलं आहे. संजय राऊत का त्रागा करून घेत आहेत माहीत नाही. कागदपत्रांच्या आधारे सोमय्या यांनी आरोप केला आहे. राऊतांनी त्यावर बोलले पाहिजे. सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. थातूरमातूर उत्तरे देऊ नये, असं सांगतानाच आरोप राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नसते तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. त्यामुळे जमिनीचे 21 व्यवहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहेत की नाही ते राऊतांनी सांगावे, असे कदम म्हणाले. मला राऊत यांच्याबद्दल व्यक्तीगत खूप आदर आहे. पण त्यांनी आता माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी आरोपाचे उत्तर दिले आहे का?, असा सवालही त्यांनी केला.