भाजपची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी


कोलकाता – मागील काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होण्याबरोबरच भाजप कार्यकर्त्यांवर अनेकदा होणाऱ्या हल्ल्यांमुळे आता पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवस्त झाल्याचे भाजपने म्हटले आहे. बिहारमधील विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे. राज्याचे भाजपध्यक्ष दिपील घोष यांच्या ताफ्यावर गुरुवारी दगडफेक झाल्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय निष्पक्षपणे निवडणूक घेता येणार नसल्याचे घोष यांनी म्हटले आहे.

घोष यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांसारखे पश्चिम बंगालमधील पोलीस हे वागत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये निष्पक्षपणे निवडणूक घेण्यासाठी लागू करावीच लागेल, असेही घोष यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये २९४ जागा आहेत. भाजपला राज्यातील मागील विधानसभा निवडणुकांमध्ये चांगला फटका बसला होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच २११, काँग्रेसने ४४, डाव्या पक्षांनी २६ तर भाजपने केवळ तीन जागा जिंकल्या होत्या. बंगलाच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी १४८ जागा जिंकणे आवश्यक असते.

राज्यातील भाजपध्यक्ष असणाऱ्या दिलीप घोष यांच्या ताफ्यावर गुरुवारी दगडफेक करण्यात आली. घोष यांचा ताफा अलीपूर मार्गे जात असतानाच हा हल्ला झाला. या दगडफेकीमध्ये घोष यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. या हल्ल्यामागे गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या विमल गुरुंग यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची शक्यता भाजपने व्यक्त केली आहे. घोष यांचा ताफा ज्या मार्गाने येत होता त्याच मार्गावर गोरखा जनमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. घोष यांना या कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले. आंदोलनाचा काहीच परिणाम होत नसल्याचे पाहिल्यावर या कार्यकर्त्यांनी हिंसक होत गाडीवर दगडफेक केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. काही दिवसांपू्र्वी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली होती.