सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कुणाल कामराचे ट्विट “ना वकील, ना माफी, ना दंड….”


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणार कामरा अडचणीत आला असून अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाळ यांनी अवमान खटला दाखल करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर आपली बाजू मांडताना कुणाल कामरा याने ट्विट करत पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. ट्विटरवर त्याने एक पोस्ट शेअर केली असून ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.

कुणाल कामराने ट्विटमध्ये मी केलेले ट्विट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचे आढळले आहे. जे ट्विट मी केले होते ते सर्वोच्च न्यायालयाने प्राइम टाइम लाऊडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील माझे मत असल्याचे कुणाल कामराने म्हटले आहे. यावेळी माफी मागण्यास कुणाल कामराने नकार दिला असून, अद्यापही माझे मत तेच असून सर्वोच्च न्यायालयाने इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर बाळगलेले मौन टीका न करता दुर्लक्षित केले जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.


यावेळी आपल्यावरील खटल्याचा वेळ माझ्याइतकं महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्वाच्या प्रकरणांना द्यावा, असेही कुणाल कामराने म्हटले आहे. काही प्रकरणांचा उल्लेखही यावेळी त्याने केला आहे. इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना माझी वेळ दिली तर आभाळ कोसळेल का?, असेही कुणाल कामराने विचारले आहे. अद्याप माझ्या ट्विटसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने काही जाहीर केलेले नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील, अशी आशा कुणाल कामराने व्यक्त केली आहे. कुणाल कामराने यावेळी आपण एका ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींच्या ऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केल्याची आठवण करुन देत पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.