देशभरातील पोलिसांना मिळाले सौजन्याने धडे


नवी दिल्ली- देशभरात पोलिसांची ढासळती प्रतिमा आणि विश्वासार्हता सावरण्यासाठी ‘ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’कडून पोलिसांना सौजन्याने धडे देण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांची कार्यपद्धती ठरवून देणाऱ्या मार्गदर्शक सूचना ब्यूरोच्या वतीने जरी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अनावश्यक अटक टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्यूरोने जरी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अटक हे नियमित काम नसून अपवादात्मक कारवाई आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संशयिताला थेट अटक न करता प्रथम त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी नोटीस देण्यात यावी. या नोटिशीला प्रतिसाद न मिळाल्यास अटक करण्यात यावी. अटक करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर नाव ठळकपणे दिसेल अशी नामपट्टी असावी. अटक केल्यानंतर ‘अरेस्ट मेमो’मध्ये अटक केलेले ठिकाण आणि वेळ याची ठळक नोंद असावी. त्यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह एका स्थानिक प्रतिष्ठीत नागरिकांची स्वाक्षरी असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वय वर्ष १५ पेक्षा लहान अज्ञान मुले आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि महिला यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण करता येणार नाही. त्यांची चौकशी त्यांच्या घरी जाऊन करणे आवश्यक आहे. अटकेत असलेल्या संशयिताला मारहाण करणे, मानसिकदृष्ट्या त्रास देणे अथवा क्रूर वागणूक देणे याला सक्त मज्जाव करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही संशयिताला अवाजवी कालावधीसाठी ताब्यात अथवा अटकेत ठेवण्यात येऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.