ऑक्सफोर्डने ऑस्ट्रेलियात सुरु केले कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन


सिडनी – कोरोना विरोधात लढा देणाऱ्या जगभरातील सर्वच देशांना ऑस्ट्रेलियाने मोठा दिलासा दिला आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीला ऑस्ट्रेलियातील सीएसएल लिमिटेड कंपनीने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाने सुरुवात केली आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार कंपनीच्या व्हिक्टोरिया येथील प्लॅण्टमध्ये सोमवारपर्यंत कोरोनाच्या तीन कोटी लसी निर्माण करण्यात आल्या आहेत.

सिडनीमधील के टू जीबी रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार या वृत्ताला ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्री ग्रेग हुंट यांनी दुजोरा दिला आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेणे हे ऐच्छिक असणार आहे. पण ही लस घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणार असल्याचे हुंट म्हणाले आहेत. देशातील लोकसंख्येपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लसी उपलब्ध असल्याचा विश्वासही हुंट यांनी व्यक्त केला आहे. सर्व सामान्यांना कोरोनाची ही लस मार्च महिन्यापासून दिली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सिडनीमधील मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार ही लस बाजारात आणण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या सीएसएल कंपनीला ५० दिवसांचा वेळ लागेल. एस्ट्राजेनेका आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये तयार करण्यात आलेल्या या लसीच्या निर्मिती आणि वितरणासंदर्भात अनेक करार झाल्याचेही समजते. अद्याप ऑस्ट्रेलियातील आरोग्य यंत्रणेने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीला हिरवा कंदील दिलेला नाही. या लसीची शेवटची आणि तिसरी चाचणी या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.