अॅमेझॉन पुन्हा वादात! अंतर्वस्त्रांसह पायपुसणीवर देवी-देवतांची छायाचित्रे


मुंबई – देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. पण सोशल डिस्टेसिंगचे नियम असल्यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. पण या दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अॅमेझॉन कंपनी आपल्या व्यासपीठावरुन हिंदू देवतांची चित्रे असलेल्या अंतर्वस्त्रांसह ॐ अक्षर लिहिलेल्या पाय पुसण्या विकत असल्याचे समोर आले आहे.

पण ही विक्री भारतात करण्यात येत नसून या वस्तू परदेशांमध्ये विकल्या जात असल्यामुळे अ‍ॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला आहे. परदेशातील भारतीयांनी #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून अ‍ॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे. याआधीही अ‍ॅमेझॉनवर हिंदू देवतांच्या चित्रांची वस्त्रे, बूट विकल्याचे प्रकार घडले होते. यावेळीही भारतीयांनी विरोध केला होता.

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या श्रद्धास्थानांचे फोटो छापलेल्या वस्तू विकल्या जातात. या छायाचित्रांचा वापर हाफ पॅन्टपासून ते अंडरगारमेंटपर्यंत केला जातो. परंतू हे कृत्य हिंदू संस्कृतीमध्ये चुकीचे असल्यामुळे परदेशातील अनेकांनी अॅमेझॉनविरोधात मोहिम उघडली असून अॅमेझॉन अ‍ॅप अनइन्स्टॉल करायला सांगितले आहे. तर अनेकांनी त्या वस्तूंची विक्री बंद करून तातडीन त्या वस्तू हटविण्यची मागणी केली आहे. हा हॅशटॅग वापरुन ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. असे प्रोडक्ट भारतामध्ये विकले जात नसले तरी असे प्रोडक्ट जगातील इतर देशांमध्ये विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरुन केला आहे.