बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते


पाटणा – आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होऊ लागले असून मतमोजणीत एनडीएला बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला ७३ जागांची आघाडी आहे तर जेडीयूला ४९ जागांची आघाडी आहे तर सध्या राजद ६८ जागांवर आघाडी आणि अवघ्या २० जागांवर काँग्रेसला आघाडी मिळाल्याचे निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांवरून दिसत आहे. रात्री उशीरापर्यंत संपूर्ण मतमोजणीचा निकाल येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

काँग्रेस-राजद आघाडीला बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये मोठ्या प्रमाणात बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. पण एनडीएनेही हळूहळू मुसंडी मारली. एनडीए १३० पेक्षा जास्त जागांवर सध्या आघाडीवर आहे. शिवसेनेने या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते, बिहारमध्ये शिवसेना पहिल्यांदा ५० जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले. पण २२ जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले होते, पण यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले आहे.

जेडीयूने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेनेला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवता येणार नसल्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिवसेनेला निवडणूक आयोगाने बिस्किट चिन्ह दिले, पण नापसंत पडल्याने शिवसेनेने दुसरे चिन्ह देण्याची मागणी केली, निवडणूक आयोगाने शिवसेनेची विनंती मान्य करत तुतारी वाजवणारे चिन्ह शिवसेनेला दिले होते. दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतदान झाल्याचे दिसून आले.