भाजपचे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी चार उमेदवार जाहीर


मुंबई – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. भाजपने शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना तिकीट दिले आहे. उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना तिकिट देण्यात आले आहे. सामना महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा भाजपला करावा लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत. तर नागपुरात गडकरी समर्थक अनिल सोले यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फडणवीसांचे पारडे जड होणार आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.