मुंबई महानगरपालिकेकडून लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी केवळ 2 तास फटाके वाजवण्याची परवानगी


मुंबई – अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला असला तरी यंदा देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने दिवाळीच्या सणामध्ये फटाके फोडण्यावर आणि आतषबाजीवर बंदी घातली आहे.

याच दरम्यान दिवाळीच्या सणात यंदा केवळ लक्ष्मीपुजनम्हणजे 14 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 8-10 या वेळेत मुंबईकरांना खाजगी परिसरामध्ये फुलबाजा आणि पाऊस उडवण्याची परवानगी दिली आहे. पण अन्य दिवशी फटाके फोडण्यावर बंदी घालत यंदा दिवाळी सजगतेने आणि सतर्क राहून साजरी करण्याचे आवाहन केले आहे.


दरम्यान कालच जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पर्यावरणपुरक साजरी करण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रात फटाकेबंदीचा निर्णय घेतलेला नाही, पण मी आपण सर्वांना आवाहन करतो की कमीत कमी फटाके फोडा. पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करा. पण मुंबई महानगरपालिकेकडून आज फटाके आणि आतषबाजीच्या बंदीचे नियम जारी करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेने जारी केलेल्या नियमावलीनुसार, यंदा दारात रांगोळी आणि पणत्यांसोबत साबण-पाणी ठेवा. सॅनिटायझरचा वापर टाळा. सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने त्याचा वापर करून दिव्यांजवळ जाऊ नका. तसेच फटाक्यांमुळे धूर होऊन आगामी दिवसांत श्वसनाचे त्रास होऊ शकतात. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा भडका उडू शकतो. त्या पार्श्वभूमीवर फटाकेबंदी घालण्यात येत आहे.