वारकरी संप्रदायाचा इशारा; कार्तिकी यात्रा रद्द केल्यास निवडणुकांवर बहिष्कार


पंढरपूर – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेप्रमाणे संचारबंदीसारखे कडक निर्बंध घालून कार्तिकी यात्रा रद्द केल्यास आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या मतदानावर वारकरी संप्रदाय बहिष्कार टाकेल, असा गंभीर इशारा वारकरी संप्रदायाकडून राज्य शासनाला देण्यात आला.

कार्तिकी यात्रेचे नियोजन केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेले नियम तसेच वारकरी संप्रदायाने यात्रा नियोजनासंदर्भात राज्य शासनाला दिलेला प्रस्ताव या दोन्हीच्या समन्वयातून केले जावे अशी वारकरी संप्रदायाची मागणी आहे. संत वंशज, प्रमुख वारकरी संघटना व महाराज मंडळी यांचा एकत्रित समावेश असणारी ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ कार्तिकी यात्रेसंदर्भात सर्वसमावेशक अशी एकच भूमिका मांडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. रविवारी याबाबतची माहिती देण्यासाठी येथील वासकर महाराजांच्या वाड्यात खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी देवव्रत ऊर्फ राणा महाराज वासकर यांनी हा इशारा दिला.