या देशांचे आहेत ‘हे’ राष्ट्रीय प्राणी

animal
प्रत्येक देशाची राष्ट्रीय चिन्हे त्या त्या देशाचे प्रतीक असतात. या चिन्हांमध्ये ध्वज, प्राणी, पक्षी, इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. पण काही देशांनी आपल्या राष्ट्रीय चिन्हांची निवड करताना कल्पकतेचा वापर केलेला आढळतो. उदाहरणच द्यायचे झाले, तर स्कॉटलंडचे देता येईल. या देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘युनिकॉर्न’ आहे. कपाळावर लहानसे शिंग असणारा हा घोडा खरे तर काल्पनिक आहे. पण तेराव्या शतकामध्ये या काल्पनिक प्राण्याची लोकप्रियता इतकी जास्त होती, की हा प्राणी खरोखरच अस्तित्वात असावा अशी लोकांची ठाम समजूत होती. अनेक आख्यायिकांच्या अनुसार युनिकॉर्न अतिशय बलशाली प्राणी असून, एखाद्या हत्तीहूनही अधिक ताकद या प्राण्यामध्ये होती. म्हणूनच शक्तीचे प्रतीक असलेल्या या प्राण्याची निवड स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी म्हणून करण्यात आली.
animal1
भूटानच्या ध्वजावर दिसणारा भयंकर आक्राळ-विक्राळ ‘द्रुक’ नामक ड्रॅगन या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. ‘द्रुक यूल’ किंवा ‘लँड ऑफ द थंडर ड्रॅगन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाचे ‘द्रुक’ हे प्रतीक आहे. या ड्रॅगनच्या पंज्यांमध्ये दर्शविलेली रत्ने या देशाची संपन्नता दर्शवितात, तर याच्या चेहऱ्यावरील आक्राळ-विक्राळ भाव या देशाच्या शत्रूंना भय दाखविण्यासाठी आहेत असे म्हटले जाते. भूटानमधील नागरिकांसाठी या द्रुकचे महत्व इतके मोठे आहे, की या देशाच्या पुढाऱ्यांना देखील ‘द्रुक ग्याल्पो’ म्हटले जाते. ‘थंडर ड्रॅगन किंग्ज’ असा या पदवीचा अर्थ आहे.
animal2
इंडोनेशियामधील कोमोडो आयलंडवर आढळणारा कोमोडो ड्रॅगन हा प्राणी काल्पनिक नसून, अस्तित्वात असलेला प्राणी आहे, आणि इंडोनेशियाचा राष्ट्रीय प्राणी ही आहे. एखाद्या विशालकाय पालीप्रमाणे दिसणारा हा प्राणी अतिशय विषारी असून, याच्या लाळेचा स्पर्श झालेल्या व्यक्तीचा काही अवधीतच मृत्यू होतो. हे प्राणी मांसाहारी असून, स्वतःच्या पिल्लांना देखील खाणारे आहेत. गाय हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी असून, गाईचे पूजन नेपाळमध्ये अतिशय शुभ मानले जाते. गोहत्या नेपाळमध्ये कायद्याने मना असून, दर वर्षी दिवाळीच्या वेळी साजऱ्या होणाऱ्या ‘तिहार’ या सणामध्ये गाईचे पूजन केले जाण्याची परंपरा या देशामध्ये रूढ आहे.

Leave a Comment