हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतू

winter
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीन ऋतूंमध्ये हिवाळा सर्वात उत्तम समजला जातो. कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागते आणि खाल्लेले अन्न पचन होते. शरीराला ऊर्जा भरपूर प्राप्त होते. परंतु त्या मानाने ती कमी खर्च होते. कारण हिवाळ्यात कितीही काम केले तरी थकवा येत नाही. परंतु उन्हाळ्यात मात्र भूक कमी लागते, पचन मंद होते, अन्न कमी जाते, ऊर्जा कमी निर्माण होते; पण थकवा लवकर येत असल्यामुळे ऊर्जा भरपूर लागते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये लागणार्‍या जादा ऊर्जेचा साठा हिवाळ्यातच केला जातो. म्हणून एका अर्थाने हिवाळा हा ऊर्जा साठविण्याचा महिना म्हणवला जातो.

थोडे तेल अधिक असलेले खाद्यपदार्थ खाऊन ऊर्जा साठवता येते. त्यातून शरीरात थोडी चरबी निर्माण होते. हीच चरबी उन्हाळ्यात खर्ची पडते. दिवाळीला हिवाळा सुरू होतो तेव्हा चकल्या, करंज्या, कडबोळी असे तळलेले पदार्थ खाण्याची परवानगी असते. ते पचनही होतात आणि त्यातली चरबी साठवली जाते. हे हिवाळ्यातले तेल खाणे संक्रांतीपर्यंत आणि नंतरच्या रथसप्तमीपर्यंत जारी राहते. संक्रांतीत तिळाचे पदार्थ खाल्ले जातात. म्हणून हिवाळ्यामध्ये आहार घेताना काही गोष्टी आवर्जून कराव्यात.

रोज रात्री झोपताना एक ग्लास भरून दूध प्यावे आणि त्यात एक चमचा लोणकढे तूप टाकावे, म्हणजे झोपही चांगली लागते आणि तुपाच्या रुपाने पोटात चरबी साठते. अशाच पद्धतीने आयुर्वेदामध्ये निरनिराळ्या पद्धतीने तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तूप, एक चमचा पिठी साखर आणि थोडेसे मिरे एकवटून खावेत असेही आयुर्वेद सांगतो.

Leave a Comment