रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ११ नोव्हेंबरपासून सुरु होणार या राज्यातील लोकल सेवा


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्याचा प्रश्न प्रतिक्षेत असतानाच रेल्वे मंत्रालयाने पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालमधील लोकल सेवा ११ नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी माहिती दिली आहे.


पश्चिम बंगालमधील उपनगरीय लोकल सेवा ११ नोव्हेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असे पियूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि ईस्टर्न रेल्वेमध्ये मंगळवारी लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतरच लोकल सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल सेवा सुरु करण्यासाठी साऊथ ईस्टर्न रेल्वेला परवानगी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर लोकल प्रवासासाठी नियमावली तयार केली जात आहे.