आरक्षणाचा प्रश्न न सुटण्यामागे मराठा समाजातील नेते आणि संघटनांमध्ये असलेला अहंभावच कारणीभूत


सातारा – वेगेवगळ्या पक्षातील रथी, महारथी मराठा आरक्षणासाठी असून या प्रकरणी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे. यासाठी आपण अनेकदा मागणी केली असून विनंती देखील केल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांची इच्छा असेल तर साष्टांग दंडवत घालण्याचीही माझी तयारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. इतर जाती-जमातींसाठी जसे करता त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही प्रयत्न करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.

अनेक जाती, समाजाला आजवर आरक्षण दिले, कुणाला नव्याने हवे आहे. पण सगळा देश, समाज या आरक्षणामुळे जातीजातीत वाटला जात आहे. समाजात कटुता निर्माण झाली आहे, एक राष्ट्र म्हणून हे खूप वाईट, असल्याची खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर उदयनराजे भोसले यांनी आपले परखड मत मांडले. मराठा समाजात राजकारण नसते तर मागेच आरक्षण मिळाले असते. इगो प्रॉब्लेम मराठा समाजातील संघटनांमध्ये आहे. समाजात आरक्षणामुळे दुरावा निर्माण झाल्याची, भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

समाजात आरक्षणामुळे दुरावा निर्माण झाल्याची खंत व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, की कधी जाती-पाती छत्रपती शिवाजी महाराजांनी मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. व्यक्तीच्या गुणवत्तेला त्यांनी महत्त्व दिले. स्वत:ला मी कधी मराठा म्हणवून घेत नाही. सर्व जाती-समाज मी आपलाच मानतो. पण आज माणसे या वाढत्या आरक्षणामुळे दुरावली जात आहेत. सगळा समाज कप्प्यांमध्ये वाटला जात आहे.

आपल्याला कधीतरी गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती यातच दडलेली आहे. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले. लहानपणापासूनचे जिवाला जीव देणारे मित्र दूर झाले. त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मराठा समाजातीलही अनेकांना आधाराची गरज आहे, त्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. त्याचा विचार व्हायला हवा. परंतु हा प्रश्न न सुटण्यामागे मराठा समाजातील नेते आणि संघटनांमध्ये असलेला अहंभावच कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.