दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी माहिती


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील शाळा-कॉलेज मागील सात ते आठ महिन्यांपासून बंद आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु केली असली, तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या शाळांबाबत निर्णय झालेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा, प्रवेश आणि शैक्षणिक वर्ष याबाबतची चिंता सतावत असतानाच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मे पूर्वी १० आणि १२ वीच्या परीक्षा घेणे शक्य नाही, दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्यामुळे यावर लवकरच निर्णय होईल. शाळा-कॉलेज दिवाळीनंतर सुरु झाल्या तर मुलांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून, योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. दिवाळीनंतर जर शाळा-कॉलेज सुरु झाल्या तरच १० आणि १२ वीच्या परीक्षा मे महिन्यात घेता येऊ शकतात, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार १० आणि १२ वीच्या परीक्षा मे महिन्यात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे, कारण त्यापुढे परीक्षा जर गेल्या तर त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू शकतो. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा सुरु होईल, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. त्यानंतर निकाल यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होऊ शकतो, ते आम्हाला नको आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णयही घेतला असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये शाळा सुरु होणे गरजेचे असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

त्याचबरोबर पहिली ते आठवी इयत्तेच्या शाळा सुरु करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही, ९ वी ते १२ वी शाळा पहिल्या टप्प्यात सुरु केल्या जातील, बाकींच्याचे ऑनलाईन वर्ग सुरुच राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील. एकदा शाळा सुरु झाल्या तर पुन्हा बंद होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आमची प्राथमिकता आहे. परंतु शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये याची तयारी केली जात आहे. ज्याप्रकारे दिल्ली, आंध्र प्रदेशात शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, तसा आपल्या राज्यात होऊ नये यादृष्टीने पावले उचलली जात असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात येतील, यात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. जो निर्णय शिक्षण मंत्रालयाकडून होईल तो राज्यभर लागू असेल, पण स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थिती पाहून त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात. जुलै महिन्यात दुर्गम भागात आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या शाळा केंद्र सरकारच्या विरोधामुळे बंद कराव्या लागल्या. सध्या बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेता मर्यादित वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. यावर लवकरच निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.