फटाक्यांवर बंदी घालणारे दिल्ली ठरले पाचवे राज्य


नवी दिल्ली – दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर राजधानीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा, त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी फटाक्यांवर राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही बंदी घातली आहे.

दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे वाढत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी ही माहिती मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोना आढावा बैठकीनंतर बोलताना दिली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दिल्लीत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दिवसाला सहा हजाराहून जास्त रुग्णांची नोंद झाली.


यासंदर्भात अरविद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनास्थितीचा मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत आढावा घेतला. कोरोना रुग्णसंख्या सणांचा काळ आणि प्रदूषण यामुळे वाढत आहे. त्यामुळे फटाक्यांवर बंदी तसेच वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमधील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही वाढवले जाणार आहेत.