या युवा बागाईतदाराने बनविली स्मार्ट सफरचंद बाग

करोना काळात घराबाहेर पडता येत नसल्याचा उपयोग हिमाचल मधील एका युवा बागाईतदराने सफरचंदाची स्मार्ट बाग बनविण्याच्या कामी केला असून देशातील ही पहिलीच स्मार्ट बाग असल्याचे म्हटले आहे. सिमल्यापासून ८८ किमीवर असलेल्या चौपाळ येथील ही बाग तेजस्वी डोग्रा हा तरुण घरबसल्या मोबाईलवरून नियंत्रित करतो आहे.

तेजस्वी उच्च न्यायालयात वकील आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सिमला येथे झाले असून त्याने पदवी पंजाब विद्यापीठातून घेतली आहे. लहानपणापासून त्याला इलेक्ट्रॉनिक्सची आवड आहे. करोना मुळे लॉकडाऊन सुरु झाल्यावर तेजस्वीने आपली बाग स्मार्ट बनवावी यासाठी प्रयत्न केले आणि कोडिंग प्रोग्रामिंग करून स्मार्ट बाग तयार केली.

या ठिकाणी त्याने सफरचंदाची २५० रोपे इटली मधून आयात करून लावली आहेत. तेथे ठिबक सिंचन, कीटक नाशक फवारणी, तापमान नियंत्रण या सर्व सुविधा मोबाईल वरून नियंत्रित करता येतात. फवारणी आणि तापमान नियंत्रणासाठी स्मार्ट ओव्हरहेड शॉवर लावले आहेत. बागेची पाहणी करण्यासाठी ३६० अंशात फिरणारे कॅमेरे असून तेही मोबाईलशी जोडले गेले आहेत. बागेचे मुख्य दार उघडणे, बंद करणे ही सुविधा सुद्धा मोबाईल वरून कंट्रोल करता येते. सेन्सर आणि मायक्रोचीपच्या सहाय्याने मोबाईल वरून ही सर्व कामे तेजस्वी घरबसल्या करू शकतो.