या गावाने यंदा फ्रेंच बुलडॉगची मेयर म्हणून केली निवड

फोटो साभार अमर उजाला

अमेरिकेत ट्रम्प तात्या पुन्हा येणार की जो बायडेन त्यांची जागा घेणार हे अजून गुलदस्त्यात असतानाचा अमेरिकेतील केंटुकी मधील रॅबीट हॅश या छोट्याश्या शहराने त्यांच्या नव्या महापौराची निवड केली आहे. यावेळी त्यांनी महापौर म्हणून फ्रेंच बुलडॉग जातीच्या कुत्र्याची निवड केली असून त्याचे नाव आहे विल्बर बीस्ट. विशेष म्हणजे येथे १९९० पासून कुत्राच महापौर म्हणून निवडला जातो आहे.

केंटुकी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार ओहिओ नदीकाठी हे चिमुकले गाव असून हे अनधिकृत वस्ती मानली जाते. या समुदायाने हिस्टॉरिकल सोसायटीला एक डॉलर दान करून मतदान केले. फॉक्स न्यूजने यंदा फ्रेंच बुलडॉगची नेता म्हणून निवड झाल्याचे म्हटले आहे. विल्बरने १३१४३ मतांनी ही निवडणूक जिंकली. त्याने जॅक रॅबीट बीगल व पॉपी गोल्डन रिट्रीव्हर याना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर ढकलले. लेडी स्टोन ही १२ वर्षाची कुत्री तिचे शहराची राजदूत हे स्थान कायम राखण्यात यशस्वी झाली.