बायडेन यांची आघाडी कायम राहिल्यास ट्रम्प यांचा पराभव निश्चित


न्यूयॉर्क – अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे श्वेत-कृष्णवर्णीय हे कार्ड अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. मतदानपूर्व सर्व्हेचे निष्कर्ष चुकीचे ठरवत ते तगडी लढत देण्यात यशस्वी ठरले. मतदानानंतरच्या चाचणीनुसार, ट्रम्प यांच्या अप्रवासी धोरणाविरुद्ध ८७% आणि ६७% आशियाई वंशाच्या लोकांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांना मतदान केले.

बायडेन २० वर्षांतील सर्वात रोमांचक लढतीत विजयाकडे वाटचाल करत आहेत. २३७ इलेक्टोरल मते त्यांना पडली आहेत. ३३ मते असलेल्या ३ राज्यांत ते आघाडीवर आहेत. तर, २१३ मते ट्रम्प यांना असून ५४ इलेक्टोरल मते असलेल्या ४ राज्यांत ते आघाडीवर आहेत. व्हाइट हाऊसमध्ये विराजमान होण्यासाठी २७० मते हवी आहेत. अद्याप पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, विस्कोन्सिन आणि नॉर्थ कॅरोलिनासारख्या राज्यांतून टपालाने पाठवलेली मते मोजण्यात आलेली नाहीत. म्हणूनच ११६ वर्षांत प्रथमच मतदानादिवशी राष्ट्राध्यक्ष ठरला नाही.

ट्रम्प यांनी या राज्यांतील ८० लाख मतांची मोजणी होण्यापूर्वीच आपल्या विजयाची घोषणा केली होती. या मतांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी न्यायालयात जाण्याची धमकीही दिली आहे. तर, लोकांना संयम राखण्याचे आवाहन करत आपण विजयाकडे वाटचाल करत असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, पूर्ण मतमोजणी होईपर्यंत निकाल स्पष्ट होणार नाही.

बायडेन यांच्या पक्षाला भारतीयांची अधिक लोकसंख्या असलेल्या ६ पैकी ५ राज्यांत विजय मिळाला आहे. भारतीय वंशाचे डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती विजयी झाले आहेत. रिपब्लिकन नीरज अंतानी ओहायोतून सिनेटमध्ये दाखल झाले आहेत. न्यूयॉर्कमधून मीरा नायर यांचा मुलगा जोहरान व वकील जेनिफर राजकुमार विजयी ठरले.

टपालाने पाठवलेली मते अमेरिकेत प्रथमच सरकार पलटवू शकतात. यंदा विक्रमी ६.५ कोटी मते टपालाने (मेल-इन) पडली होती. ट्रम्प सुरुवातीपासूनच हा घोळ असल्याचे म्हणत आहेत. दुसरीकडे, बायडेन व कमला हॅरिस यांनीही आपली मते टपालाने पाठवली. तर बूथवर जाऊन ट्रम्प यांनी मतदान केले आणि आपल्या समर्थकांना मतदानाच्या दिवशीच मतदानाचे आवाहन केले. आता ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमधून हीच टपाली मते गच्छंती करू शकतात. आता फक्त मेल इन मतांची मोजणी बाकी आहे. यात बायडेन आघाडीवर असल्याचे अमेरिकेचे सर्व पोल सांगत असल्यामुळे ट्रम्प सुरुवातीपासून त्याविरुद्ध बोलत आलेले आहेत.

दरम्यान आठ राज्यांची मतमोजणी बाकी आहे. तर ४ राज्यांतून आलेल्या टपाली मतांची मोजणी झाली नाही. यंदा कोरोनामुळे ६.५ कोटी टपाली मते आली. यातील बहुतांश बायडेन यांच्या बाजूने आहेत. कारण लवकर मतदान घेण्यासाठी त्यांनी निवडणूक मोहीम राबवली होती. अद्याप या मतांची मोजणी पूर्ण झालेली नाही.

एरवी २७० चा आकडा गाठणाऱ्या नेत्याला आधीच विजयी घोषित केले जाते. पण त्यानंतरही औपचारिकरीत्या मतमोजणी सुरूच राहत असते. परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यामधील यंदाची लढत अत्यंत चुरशीची होत असल्यामुळे असे होताना दिसलेले नाही. दरम्यान ट्रम्प यांनी टपाली मते बोगस असल्याचे म्हटले आहे. प्रकरण आता न्यायालयात जाईल. ३ तारखेनंतर मिळणाऱ्या टपाली मतांची मोजणी व्हावी की नाही, यावर न्यायालयात युक्तिवाद केला जाईल. न्यायालयात प्रकरण लांबल्यास निवडणुकीचा निकालही लांबू शकतो. निकाल २० जानेवारीच्या आधी मिळू शकेल.

२६९-२६९ मते दोन्ही उमेदवारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत नवीन अध्यक्ष प्रतिनिधी सभा निवडेल, तर राष्ट्राध्यक्ष नवीन सदस्य निवडतील. यात ५० राज्ये एक-एक मत टाकू शकतील. पुन्हा २५-२५ वर टाय झाल्यास निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईपर्यंत अशाच प्रकारे मतदान सुरू राहील. ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीतून ५३८ इलेक्टोरेट निवडले जातील. १४ डिसेंबरला ते राष्ट्राध्यक्षांची निवड करतील. तसेच आपल्या पक्षाला मत देण्यासाठीही ते बांधील नसतात. २०१६ मध्ये १० इलेक्टोरेटने पक्षाच्या विरोधात मतदान केले होते. पण निकालावर याचा परिणाम झाला नव्हता. यंदा या नेत्यांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरेल.