हवाई दलाचे सामर्थ्य वाढले; भारतात दाखल झाली राफेलची दुसरी तुकडी


नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली असून कारण तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच आज भारतात दाखल झाली आहे. ही विमाने गुजरातमधील जामनगर एअरबेसवर उतरली. तत्पूर्वी पाच राफेल विमानांची पहिली बॅच पंजाबमधील अंबालामध्ये दाखल झाली होती. फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमाने भारताने खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. भारतात आत्तापर्यंत एकूण आठ विमाने आली आहेत.

पाच राफेल विमानांची पहिली बॅच 26 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. ही विमाने भारतात अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.

दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी प्रवासा दरम्यान कोणताही थांबा घेतला नाही. फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे प्रवासादरम्यान या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. प्रत्येक दोन महिन्यांनंतर हवाई दलाला तीन ते चार राफेल विमाने दिली जाणार आहेत.

भारतीय हवाई दलात जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 ही लढाऊ विमानांचा समावेश झाल्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्यात भर पडणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.