गोस्वामींच्या अटकेनंतर महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची आणीबाणी 2.0 अशी पोस्टरबाजी


नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात आक्रमक झाला असून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पोस्टर्स लावले आहेत. ‘आणीबाणी 2.0’ असा यावर उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. तुमचे आणीबाणी 2.0 मध्ये स्वागत असल्याचा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.


याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी घणाघाती टीका केली आहे. जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरसारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वागत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. आणीबाणीसारखी स्थिती महाराष्ट्रात असून हिटलरसारखे उद्धव ठाकरे वागत आहेत. हे सरकार शक्य तितक्या लवकर बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी देखील बग्गा यांनी केली होती.