कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबागमधील नगरपालिका शाळेत अर्णब गोस्वामींसह इतरांची रवानगी


रायगड : अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट जेलमध्ये न नेता कोणत्याही आरोपींना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. त्यामुळे नगरपालिकेच्या शाळेत या तिघांना ठेवण्यात आले आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल (4 नोव्हेंबर) इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण कोणत्याही आरोपींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमध्ये न ठेवता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना ठेवले जाणार आहे. आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून अलिबागमधील ही शाळा करण्यात आली आहे. त्यांना यातच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे.

दरम्यान, काल सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. यानंतर अलिबाग येथे अर्णब गोस्वामी यांना आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अर्णब यांच्या प्रकरणाची तेव्हापासून सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णब गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.