मेव्हण्याला धमकी दिल्या प्रकरणी माजी खासदार संजय काकडेंसह पत्नीची अटक व सुटका


पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात गुरुवारी सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. दुपारी १२ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

युवराज ढमाले (वय ४०) यांनी या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. काकडे यांना अटक करण्यासाठी बुधवारी चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु त्या ठिकाणी ते सापडले नाहीत. गुरुवारी सकाळी घरी जाऊन त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजता न्यायलायात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. काकडे दाम्पत्याला या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. ढमाले यांच्या वतीने विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली.

तक्रारदाराने आता हा कौटुंबिक वाद असून, दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारदारासोबत या दोन वर्षांत माझे आणि पत्नीचे साधे बोलणेही झालेले नसताना, मग आताच हे आरोप का केले याचे आश्चर्य वाटत आहे. आता यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयात आज प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेचे आम्ही पालन करत आहोत, असे संजय काकडे यांनी सांगितले.