‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी भाजप आमदार राज्यपालांच्या भेटीला


मुंबईः भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका हाती घेतली असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप आमदार राम कदम यांनी भेट घेतली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात गोस्वामी अटक केली असून पोलिसांनी आपल्याला अटकेदरम्यान मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तसेच, पोलिसांनी आपल्या कुटुंबातील सदस्य व मुलालाही मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले होते. भाजप आमदार राम कदम यांनी हाच धागा पकडत राज्यपालांची भेट घेतली आहे.


अर्णब गोस्वामी यांना मारणार करणाऱ्या त्या ९ पोलिसांवर त्वरित कारवाई करून त्यांचं निलंबन करा अशी मागणी राज्यपालांच्या भेटीत राम कदम यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशीही करण्यात यावी असेही त्यांनी राज्यपालांना सांगितले. त्याचबरोबर आम्हाला पोलिसांप्रति आदर आहेच पण मारहाणीचे समर्थन होऊ शकत नसल्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

याच प्रकरणात मुख्यमंत्र्यांना देखील राम कदम यांनी पत्र लिहिले आहे. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी गोस्वामींना मारहाण केली. त्याचे समर्थन देशातील कोणताही नागरिक करु शकत नाही. या ९ पोलिसांना निलंबित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेनं नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोस्वामींसह देशाची माफी मागावी आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी, असेही, राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे.