ट्रम्प-बायडेन यांच्या चुरशीची लढत, ट्रम्प यांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा


वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीचा लढत सुरु असतानाच मतमोजणी दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेत आपल्या विजयाचा दावा केला आहे. त्याचवेळी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा ट्रम्प यांनी आरोप केला आहे. या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलो असल्याचे ट्रम्प व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हणाले.

दुसऱ्या अन्य राज्यात आपण जिंकत असल्याचे जाहीर करणार होतो आणि तितक्याच हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नसल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेत उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प त्यांच्या शेजारी होत्या.

रिपब्लिकन विजयाचा आनंद साजरा करणार होते, तेवढ्यात अचानक हे घडल्याचे, ट्रम्प म्हणाले. निकाल अभूतपूर्व असून विजय आपला नक्कीच होणार आहे, अनेक राज्यांमध्ये आपण खूपच पुढे आहोत. तेथील आकडे आता हळूहळू समोर येत आहेत. ते आपली बरोबर करु शकत नसल्याचे ट्रम्प म्हणाले. ज्या राज्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे, तिथे मोठया मताधिक्क्याने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा दावा ट्रम्प यांनी केला. फ्लोरिडा, ओहायो आणि टेक्सास या महत्त्वाच्या राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवल्यामुळे बायडेन यांना विजयी मताधिक्क्य मिळवता आले नाही.