अर्णब गोस्वामीला अटक करण्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल -किरीट सोमय्या


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला गेले आहेत.


दरम्यान, यावरून भाजपने आता ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या या कारवाईवरून ठाकरे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे, त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजवी लागेल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.


आम्ही अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करतो. ठाकरे सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे. तेव्हापासून पत्रकारांना सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट यांना पोलीस बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या नौदल अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यास मारहाण करणे, एखाद्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचे मुंडन करणे व पत्रकारांना तुरूंगात टाकणे, याचे उत्तर ठाकरे सरकारला द्यावे लागेल, असे ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, अर्णब गोस्वामींना भेटायला मी अलिबाग पोलीस स्टेशनला जाण्यासाठी मुंबईहून निघालो, असल्याचीही माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.