रिसर्चचा धक्कादायक खुलासा; ट्रम्प यांच्या रॅलीमुळे 30,000 जणांना कोरोनाची लागण, 700 जणांचा मृत्यू


न्यूयॉर्क : अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 18 रॅली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्या. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली, तर 700 जणांचा मृत्यु झाल्याचे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात समोर आले आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या 18 रॅली निघाल्या. ज्यामुळे जवळपास 30 हजार लोक कोरोनाबाधित झाले. त्याचबरोबर ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि ज्यांचा मृत्यू झाला, ते ट्रम्प यांची रॅली जिथे झाली, तेथे गेलेच असतील असे नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडेन यांनी स्टॅमफोर्ड युनिव्हसिटीच्या अहवालाबाबतच्या एका ट्विटर पोस्टवर म्हटले की, तुमची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना काळजी नाही. त्यांना तर त्यांच्या समर्थकांचीही चिंता नाही. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात अमेरिकेतील 87 दशलक्षाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 लाख 25 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिवेंशन (सीडीसी) यांनी म्हटले की मोठ्या सभांमध्ये जेथे लोक मास्क लावत नाहीत आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवत नाहीत, तेथे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर अशा मोठ्या सभांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो आणि कोरोनाविरुद्धची लढाई कमजोर होते, असे देखील सीडीसीने म्हटले आहे.