कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुख सेल्फ क्वॉरन्टाईन


नवी दिल्ली : संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यातच या महामारीने सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या विळख्यात ओढले आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा व्यक्तीच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी मी आलो होतो, ज्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी सांगितले आहे.


ही माहिती स्वतः टेड्रॉस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अशा व्यक्तीच्या संपर्कात मी आलो आहे, ज्याची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी पूर्णत: ठीक असून माझ्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण नाहीत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मी येत्या काही दिवसांसाठी स्वत:च क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला असून मी घरातूनच काम करणार आहे.


त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिलं आहे की, सर्व आरोग्य मार्गदर्शन सूचनांचे आपण पालन करणे गरजेचे आहे. याद्वारे आपण कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडून आरोग्य यंत्रणांचे रक्षण करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेतील माझे सर्व सहकारी आणि मी जीव वाचवण्यासाठी तसेच लोकांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने काम करत राहणार आहोत.