‘कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजलि’ने चार महिन्यात कमावले २४१ कोटी


नवी दिल्ली – देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीने ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये विकले आहेत. यासंदर्भात कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार कंपनीने चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कोरोनिल विकून जवळपास २४१ कोटी कमावले आहेत.

कंपनीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त द प्रिंटने दिले आहे. कंपनीकडून कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार करण्यात आला होता. २३ जूनला या औषधाची घोषणा रामदेव बाबा आणि पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी केली. कोरोनावर हे औषध खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध असा दावा केल्यामुळे हे औषध वादात सापडले होते. या औषधाचे कंपनीने क्लिनिकल ट्रायल केले की नाही यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सरकारकडून घेतला होता. उत्तराखंडमधील आयुष विभागाने २४ जून रोजी पतंजलीला नोटीस पाठवून यासंदर्भात सात दिवसात उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या. उत्तराखंडच्या आयुष विभागाच्या परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी स्वत: समोर येऊन पतंजलीला रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध तयार करण्याची परवानगी आम्ही दिल्याचे म्हटले होते.