
जळगाव : एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर शिवीगाळ करून पदाधिकाऱ्यांच्या वाहनांकडे दगड भिरकावल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे़. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, पण ती व्यक्ती मनोरुग्ण असून तो भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली होती.
माजी मंत्री गिरीश महाजनांना भाजपा कार्यकर्त्याकडून शिवीगाळ!
प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी भाजपच्या बैठकीला उपस्थित होते. काही पदाधिकारी बैठक आटोपल्यानंतर बाहेर येत असतानाच हा कार्यकर्ता दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता. पण काही अन्य कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले. त्यानंतर माध्यमांशी गिरीश महाजन यांनी संवाद साधला व महाजन काही वेळानंतर परतले. पण या दरम्यान, गिरीश महाजन यांना विजय नामक या कार्यकर्त्याने शिवीगाळ करून गाडीकडे एक दगड फेकल्याची माहिती एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे. पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. भाजप कार्यालयात पोलीस जावून आले होते. पण याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल अथवा नोंद करण्यात आलेली नाही.
