आमची विधान परिषदेची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली; काँग्रेस


मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी सध्या चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण काँग्रेसने उर्मिला यांच्याकडे विधान परिषदेवर जाणार का? अशी विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.

काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. ते म्हणाले, आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिला. आता त्यांनी जर शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्यांना त्याचे स्वातंत्र्य असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना राणावतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे विधानपरिषदेवर त्यांना पाठवावे, असे शिवसेनेला वाटणे स्वाभाविक असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Loading RSS Feed