शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी?


मुंबई : शिवसेना आपल्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता असून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात कंगनाला उर्मिला मातोंडकर यांनी चांगलेच फैलावर घेतले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना उत्तर मुंबईतून काँग्रेसने उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. पण त्यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही त्यांना काँग्रेसने राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नसल्याचे उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचे समजते. तरीही महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कळते.

विशेष बाब म्हणजे शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचे कळते. अद्याप उर्मिला मातोंडकर यांचे उत्तर समोर आलेले नाही. पण मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसेच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे कळते.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावावरुन संभ्रम असल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. राज्यपालांना नाव देत असताना नेमका कोणता निकष ठरवायचा याबाबत देखील संभ्रम असल्याचे कळते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषाबाहेर नाव दिल्यास राज्यपाल त्या नावाना आडकाठी करु शकतात किंवा ही नाव फेटाळली जाऊ शकतात. या प्रकरणात न्यायालयात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबते सुरु असल्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.