सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवली सगळी तत्वे – विखे पाटील


नगर – भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते, असे म्हटले आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वाने सांगितले होते. पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असून सत्तेसाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपल्या स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायच असा प्रकार आहे. तुमच्यात राज्य चालवायची जर धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आदेश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. मी गेले ३० ते ३५ वर्षे शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण ऐकत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

विखे पाटील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही आक्रमक झाले होते. मला आश्चर्य वाटते की मंदिरे उघडायला सरकार का घाबरत आहे. परमेश्वराची यांना एवढी भीती का वाटते? मदिरालये उघडण्यासाठी तुम्ही परवानगी दिली. पण मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देत नाही. त्या त्या भागातील अर्थशास्त्र हे मंदिरांवरच अवलंबून आहे. हा फक्त भावनिक मुद्दा नाही, अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारने याचा विचार करायला हवा, असेही पाटील यांनी म्हटले आहे.