शरद पवारांचे अमेरिकेतही अनुकरण; बायडन यांच्या पावसातील सभेची जोरदार चर्चा


फ्लोरिडा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली होती. भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दी तसूभर देखील जागची हलली नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत याच सभेमुळे उदयनराजे भोसलेंचा कधी न होणारा पराभव झाला. या सभेचा फायदा राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीतही झाला. पण त्याचप्रमाणे एक सभा अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत सध्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा चर्चेत आहे.

तीन दिवसांनंतर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच मतमोजणी असल्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावला आहे. दोन्ही नेत्यांच्या नुकत्याच फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. फ्लोरिडा राज्य रिपब्लिकन पक्षाचे सरकार पुन्हा आणण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर बायडन यांनी ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे.


बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. पण बायडन यांनी भर पावसातही जोरदार भाषण केले. ड्राईव्ह इन येथे बायडन यांची रॅली होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे बायडन यांचे समर्थक कारमधून त्यांचे भाषण ऐकत होते. सध्या सोशल मीडियावर या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

पावसात केस ओले होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांना भीती वाटते. पण तशी भीती बायडन यांना वाटत नाही, अशा प्रकारचे ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहेत. बायडन यांच्या भाषणानंतर अनेकांना माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल, असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.